Time Span : 2005-2007
“एका छोट्याश्या दिवसभराच्या बैठकीत, जागेपणीचं मोठे स्वप्न , डॉ. संजीव सावजी , डॉ. नितीन बापट , अर्चना नरसापूर , प्रचिती अभ्यंकर, अरुण तोतला , श्रीकांत दरख , निवेदिता बापट आणि डॉ. मधुश्री सावजी यांनी बघितलं. आणि २००५ ला ओंकार बालवाडीच्या २२ पालकांच्या विश्वासावर , ओंकार विद्यालयाची सुरुवात झाली. पहिल्या तीन वर्षात मातृभाषेतील या विद्यालयाचे स्नेहसंमेलन हा वर्षभराचा अभ्यासक्रम झाला आणि त्याचे नामकरण " सप्तरंग सोहळा " झाले. हे आगळे वेगळे विद्यालय "मनोयोग पालक प्रबोधन" आणि " किल्ला बनवा स्पर्धेने" घराघरात पोहोचले. याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करत पालक शाळेत पोहोचले. गीतापठण,
चित्रकला आणि कराटे यातील विद्यार्थ्यांचे यश उत्साहवर्धक ठरले. सर मॅडम च्या ऐवजी ताई-दादा संबोधणाऱ्या , या छोट्या शाळेचे रूप पालटू लागले . छोटी विद्यालयाची जागा अपुरी पडू लागली . त्यामुळे स्वतःच्या विस्तीर्ण जागेचा शोध सुरू झाला . अश्याप्रकारे विद्यार्थी, शिक्षक , पालक आणि संचालक या सर्वांची शिक्षणाची आनंदयात्रा जोरात सुरू झाली.
Time Span : 2008-2011
२००८ ते २०११ या कालावधीत मुलांच्या कर्तुत्वाने शाळेची कीर्ती वाढली आणि समाजाच्या दातृत्वाने शाळेची उंचीही वाढली. वा जागेच्या शोधात महानगर हद्द सोडली , शरणापुर चे रेल्वे फाटक ओलांडले वंजारवाडी आली आणि तिथेच मोकळी जमीन मिळाली. हवा व प्रकाश युक्त जमीन सगळ्यांनाच भावली. डॉ. विनया भागवत , डॉ. लोणीकर, डॉ. सत्यनारायण सोमाणी यांच्या अर्थसाहाय्याने विश्वस्त आश्वस्त झाले. सरस्वतीच्या या भूमीवर गंगाजल टाकले आणि बोअरला पाणी लागले. सारे आनंदाने चिंब झाले .अनेक प्रथितयश व्यक्तींनी या भूमीवर वृक्षारोपण केले. उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामाचे , चौथीपर्यंतचे पाच खोल्यांचे आपले विद्यालय उभे राहिले. शाळेचे वाचनालय समृद्ध झाले. विद्यालयात गणित प्रयोगशाळेचा शुभारंभ झाला . शाळेत पाहुण्यांची येजा वाढली . पहिलीपासून चार भाषा, चार खेळ, चार कला आणि चार उपक्रम यात चौफेर प्रगती साधत बहुभाषिक विद्यालयाने संस्कृत नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळविण्यास सुरुवात केली.
Time Span : 2012-2015
२०१२ ते २०१५ ला कुंपणाने आणि शाळा अधिक सुरक्षित झाली .आणखी एक मजला चढला. विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळा व इ- वर्ग सुरू झाला. लगेचच उंच भरारी घेत महाराष्ट्रातील सर्व शालेय मुलांसाठी "वराहमिहीर विज्ञानकेंद्र " खुले झाले . पाठोपाठ या विज्ञानकेंद्राअंतर्गत "होमीभाभा परीक्षा केंद्र" सुरू झाले . त्याद्वारे सातत्याने यशस्वी होणाऱ्या बालवैज्ञानिकानी आमचे भूषण वृद्धिंगत केले. विद्यालयातील २०१५ ला दहावीच्या पहिल्या तुकडीने १००% निकाल घेवून पाडलेला पायंडा शिक्षकाच्या अथक प्रयत्नांनी अखंड चालू राहिला . विद्यालयातील जीवनमूल्ये प्रक्षेपित करणारा कार्यक्रम नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी " यशस्वी भव - शुभेच्छा समारंभ" हा एक संस्मरणीय संस्कारक्षम सोहळा बनविला
Time Span : 2016-2019
२०१६ ला क्रीडांगण तयार झाले. खेळाडूंची वाढलेली बक्षिसे २६ जानेवारीला वितरीत होऊ लागली . विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लिहिलेले नाव तुला नाव लांबून दिसू लागले. ओंकार विद्यालय " विद्याभारती देवगिरी प्रांत " संलग्नीत झाले. विद्यालयात वंदना व योग विशेषत्वाने सुरू झाले. उत्कृष्ट विद्यार्थ्याला मिळणाऱ्या "प्रज्ञाश्री" पुरस्काराची झलक त्रैमासिक पालकसभेत प्रदर्शित होणाऱ्या , प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अनेक "श्री" त दिसू लागली. "महाराष्ट्र जागतिक शैक्षणिक मंडळ" (MIEB) शी विद्यालय संलग्न झाले. शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण झाले. ओंकार बालवाडी सारखी शिशुशिक्षणाची विद्यालयात सुरुवात झाली. सप्तरंग सोहळा आणि कोजागिरी - "शरद सोहळा" शाळेच्या प्रांगणात बहरू लागला. स्वप्न सत्यात अवतरले. इवल्याशा बीजाचा, असंख्य फळांनी बहरलेला वृक्ष गगनाला गवसणी घालू लागला.
Time Span : 2020
आणि अचानक जागतिक महामारीत शाळा बंद करण्याचा आदेश मिळाला. शाळा बंद पण शिक्षण सुरू होते. तंत्रस्नेही बनत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा ऑनलाइन झाला. दरवर्षीप्रमाणे आगामी शैक्षणिक वर्षातील नववी व दहावीच्या तासिका एप्रिल मध्ये ऑनलाईन सुरू झाल्या. ऑनलाईन क्लासेस हे आव्हान स्विकारल आणि निभावलं देखील न्यू नॉर्मल प्रमाणे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालो मे मध्ये झालेल्या शिक्षक प्रशिक्षणात व्हिडीओ तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन जून मध्ये पहिली ते दहावी ऑनलाईन शाळा सुरू झाली. दिनविशेष बोधकथा अभ्यासक्रमाचे व्हिडीयो अशी दिनचर्या सुरू झाली. योगदिन, रक्षाबंधन, आषाढी एकादशी ,नवरात्री, दिवाळी सगळे उपक्रम साजरे झाले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनुकरण करत शिक्षक दिन ही साजरा केला.
पालकांनीही ऑनलाइन कोजागिरी चे नियोजन करत शाळा व पालक यांची स्नेह बांधणी अधिक घट्ट केली. पालकांच्या मिळणाऱ्या सहकार्यातून नवीन वर्षात नववी-दहावीच्या शाळाही ऑफलाइन सुरू झाली आणि बाकीच्यांसाठी अर्थातच ऑनलाइन.