व्यक्तीच्या अभिव्यक्तीचे माध्यम कला. जगायचं कसं हे शिक्षणामुळे कळते तर जगण्याला अर्थ कला देते. ओंकार विद्यालयात शालेय अभ्यासा इतकेच नव्हे तर, कणभर अधिक महत्त्व या कलांना दिलं जात. इयत्ता पहिलीपासूनच नाट्याभिनय हा विषय घेतला जातो. यात मुले छान मोकळी होतात. भावना व्यक्त करू शकतात. यातच भाषा, शब्दउच्चार, साहित्य, कविता, वाचिक आणि कायिक अभिनय मुले सहज शिकतात. आपले नऊ रस हे जगण्यातले विविध रंग आहेत. हे नवरस म्हणजे वेगवेगळ्या भावनांच्या छटा या अभिनयातून उमटतात. चित्रकलेच्या माध्यमातून, रंगाच्या कुंचल्यातून मुलांची स्वप्ने साकारतात. कागदांच्या सुबक घड्यातून रंगीबिरंगी फुल व फुलपाखरं भिरभिरतात. या सार्याक साहित्यातून ओंकार विद्यालयाच्या भिंती बोलतात. येथे नादब्रह्म अवतरते. इवलीशी बोटं तबल्यावर थिरकतात. कॅसिओ, हार्मोनियम वर बोट फिरतात. कवितेचे सुंदर गाणं होतं. अख्खी शाळा ते गाणं गुणगुणते. सूर , ताला सहीतची प्रार्थना मनाची एकतानता साधते. संगीत, नाट्य, वादन, नृत्य, चित्र, हस्तकला, अशा सगळ्या कलांचा अनोखा संगम दिसतो. लोकनृत्याच्या प्रकारात आम्ही आसाम, पंजाब, गुजरात, राजस्थानसह फिरतो व कथ्थक ,भरतनाट्यम सारखे शास्त्रीय नृत्य प्रकार ही करतो. बहुरंगी, बहुढंगी अशा कलादालनातून मुलांना बाहेर यावस वाटत नाही.