ओंकार विद्यालयाचा कौतुक सोहळा ज्यात विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विकासाचा मागोवा घेतला जातो. शालेय अभ्यासक्रमावर आधारित झालेल्या परीक्षा व त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे त्यांनी संपादन केलेले अनेक कौशल्य, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील सूक्ष्म टप्प्यांचे ताई दादांनी केलेले अवलोकन कौतुक सोहळ्यात केले जाते.
आम्ही विद्यार्थ्यांचा निकाल लावत नाही. त्यांना यश- अपयशाच्या तराजूत तोलत नाही. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. जन्मलेल्या प्रत्येकाचा विकास होतच असतो, फक्त प्रत्येकाची गती वेगळी असते. मनुष्याच्या ठिकाणी १५१ प्रकारच्या प्रज्ञा असतात. केवळ परीक्षेत अधिक मार्क मिळवणारी व्यक्ती यशस्वी किंवा मोठी होत नाही. माणूस म्हणून व्यक्ती मोठी झाली पाहिजे. हे माणूस म्हणून घडताना आपली स्ट्रेंथ कशात आहे हे कळालं तर दिशा लवकर सापडते. या टप्प्यावर कौतुकाची थाप ही प्रेरणा देणारे असते. बुद्धीची देवता ओंकार हे गणेशाचे रूप, गणेशाला २१ दुर्वा, २१ मोदकांचा नैवेद्य प्रिय म्हणून आम्ही कौतुक सोहळ्यात २१ पुरस्कार देतो. यामध्ये अंकश्री गणितातील उत्कृष्ट साठी , अक्षरश्री हा स्वच्छ लेखनासाठी ,शूचीश्री हा स्वच्छतेसाठी, सखाश्री हा मैत्रीसाठी, भोजनश्री आहाराकडे लक्ष देणारा, तर मुलांच्या वाढीकरता त्यांच्या डब्यात सकस पदार्थ देणार्याा आईचा अन्नपूर्णा माता म्हणून गौरव करण्यात येतो. पालक सभा व शाळेच्या उपक्रमात नियमितपणे येणार्यार पालकांना पालकश्री, कला शिक्षकांना कलाश्री, शिक्षकांसाठी गुरुश्री, सेवाश्री असे पुरस्कार दिले जातात. वर्षभर विद्यार्थ्यांची शाळेतील नियमितता, अभ्यास व इतर उपक्रमातील सहभाग, स्पर्धांमधील यशस्विता, त्याची वर्तणूक याचे मूल्यमापन केले जाते व प्रत्येक इयत्तेतील एका विद्यार्थ्याला 'प्रज्ञाश्री' पुरस्काराने गौरवले जाते. या वेळी मुलांना औक्षण करून, पेढा भरवून त्यांचे तोंड गोड केले जाते. सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस दिले जाते. मुले काही सादरीकरण करतात. आजवर मा. मुकुंद कानिटकर, मराठी काका वामनराव देशपांडे, अनिलजी भालेराव अशा अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळाले. प्रवेशद्वारापाशी लक्षवेधी रांगोळी , तोरण ,मंगल तिलक, सरस्वतीपूजन , वंदना , दीप प्रज्वलन अशा संपूर्ण सांस्कृतिक मंगलमय वातावरणातला हा 'कौतुक सोहळा' ओंकार विद्यालया शिवाय क्वचितच कुठे पाहायला मिळेल.